मनाचे श्लोक १-५
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा!
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा !
नमू शारदा मूळ चत्वार वाचा!
गमू पंथ आनंत या राघवाचा ||१||
गणाधीश, गणांचा अधिपती असलेला गणपती सर्व गुणांचा ईश म्हणजे स्वामी आहे यागुणांमध्ये सजीवांचे, निर्जीवांचे आणि प्रकृतिचे तीन गुण( सत्व, रज, तम ) यांचा समावेश होतो. सर्व वस्तूंचे मूळ गणपती हा ईश्वर आहे आणि दुसऱ्या बाजूने निर्गुण निराकार अशा आत्मस्वरूपाचेही मूळ म्हणजे आरंभ आहे. अशा गणतीला आणि विद्येची देवता सरस्वती म्हणजेच शारदा. चार वाणीं,वाचे मधून ( परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी) प्रगट होणाऱ्या सरस्वतीच्या अस्तित्वा ला वंदन करून श्री रामदास स्वामी म्हणतात, सगुण साकार अशा रामाची भक्ती च आपल्याला निर्गुण, निराकार अशा आत्मा रामा पर्यंत घेऊन जाऊ शकेल. म्हणून आपण सर्वांनी हा आत्मस्वरूपी राघवाकडे जाण्याचा मार्ग आक्रमावा. आत्मज्ञाना पर्यंत चा प्रवास दुष्कर व खडतर आहे. याची समर्थांना जाणीव आहे. म्हणून मनाला कोणत्याही प्रकारची बळजबरी, हुकूम किंवा आदेश न देता ते मनाला समजावित आहेत. हे मना तू व मी असे या मार्गाने गमू म्हणजे जाऊ या, यातून समर्थांच्या प्रेमळपणा ची जाणीवही होते.
!! जय जय रघुवीर समर्थ !!
==========================================================================
मना सज्जना भक्तिपंथेचि जावे
तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे
जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे
जनी वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥
समर्थ मनाला समजावून सांगत आहेत. हे सज्जन मना तू भक्तीच्याच मार्गाने जा. सज्जन म्हणजे ज्यांच्या अंगी चांगले गुण आहेत जे अतिशय सरळ साध्या स्वभावाचे आहेत व ज्यांच्या ठिकाणी द्वेष मत्सर क्रोध इत्यादी दुर्गुणांचा लवलेशही नसतो. आपलं मानवी मन हे सुद्धा मुळात शुद्ध, निर्मळ, पवित्र,निरामय, मृदू आणि कोमल आहे, पण त्यावर जन्मोजन्मीचे चांगले वाईट संस्कार इतके प्रबळ झालेले आहेत की मनाच्या मूळ स्वरूपाची जाणीव सुद्धा त्याला होऊ शकत नाही. म्हणूनच समर्थांनी मोठ्या प्रेमाने मनाला त्याच्या सज्जन पणाची जाणीव करून दिली आहे. भक्ती म्हणजे भजन.
भगवंताच्या लीला,गुण,महिमा, रूप इत्यादी पुन्हा पुन्हा आठवून व कथन करून त्यांचा रस घेणे. भगवंताचा रस घेण्यास योग्य असे मन तयार करण्यास देहाची कर्मे शुद्ध व पवित्र असलीच पाहिजेत यावर समर्थांचा कटाक्ष आहे. भक्ती मार्गाने गेल्यास ईश्वराचे दर्शन आपोआपच होईल. समाजविघातक सारी कर्मे म्हणजे निंद्य कर्मे सोडून समाजहिताची म्हणजे वंद्य कर्मे हे मना तू मनापासून (सर्वभावे ) कर. अशी कळकळीची विनंती श्री समर्थ मनाला करीत आहेत.
!! जय जय रघुवीर समर्थ !!
===========================================================================
प्रभाते मनी राम चिंतीत जावा
पुढे वैखरी राम आधी वदावा
सदाचार हा थोर सांडू नये तो
जनी तोचि तो मानवी धन्य होतो ।।३।।
प्रभाते म्हणजे पहाटे. रात्रीची झोप संपवून पहाटे जाग आल्यावर आपले मन प्रसन्न असते. अशावेळी भगवंताची मानसपूजा करावी मानसपूजा करताना भगवंताचे चिंतन आपोआप घडते. सकाळी शक्तीची गोळी घेतली की दिवसभर तिचा परिणाम टिकतो त्याचप्रमाणे प्रभातकाळी भगवंताचे चिंतन केले की तो माझ्याजवळ आहे ही भावना दिवसभर टिकते. अंतकरणात भगवंत भरून राहणे याचे नाव भक्ती. पहाटे म्हणजे ब्राह्म मुहूर्त किंवा रामप्रहर. हे राम प्रहरी केलेले रामाचे स्मरण मनातल्या मनात न करता त्यासाठी वैखरी वाणीचा उपयोग करावा. आपल्याला आवडेल त्या मंत्राचा जप करावा. वैखरीने म्हणजे मोठ्याने केलेला जप आपली वाणी पवित्र व पावन करतो. कुटुंबातील इतर माणसांवरही त्याचा परिणाम होतो. आपल्या शास्त्रात ब्राह्म मुहूर्तावर केलेल्या साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रामस्मरण अनेक प्रकारे करता येते रामनामाचा जप करावा किंवा मंत्र म्हणावे वा स्तोत्र म्हणावी.
सदाचार म्हणजे सत आचार. कोणत्याही प्रकारे स्वतःचा स्वार्थ न पाहता दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करणे. उच्चनीच,गरीब श्रीमंत,कुरूप सुंदर,गोरा काळा, हुशार मठ्ठ असा कोणत्याही प्रकारचा भेद न करता सर्वांकडे एकाच ईश्वरी शक्तीची रूप या दृष्टीने पहावे. सगळ्यांशी आपुलकीने वागून सर्वांशी अतूट असं प्रेमभावाचं नातं निर्माण करावे.असा सदाचार अत्यंत श्रेष्ठ असतो. म्हणून समर्थांनी थोर शब्द वापरला आहे सदाचार ही गोष्ट थोडा वेळ करण्याची नसून एखाद्या प्रवाहाप्रमाणे ती अखंडित राहीली पाहिजे हे सांगण्यासाठी सांडू नये हा शब्द वापरला आहे.
म्हणून सकाळी लवकर उठून जो रामाचे (भगवंताचे ) चिंतन स्मरण करतो व दिवसभर सदाचाराने वागतो त्याचे जीवन धन्य होते.
या श्लोकामध्ये समर्थांनी भक्ती व सदाचरणी व्यवहार याची सांगड घातली आहे.
!! जय जय रघुवीर समर्थ !!
========================================================================
मना वासना दुष्ट कामा नये रे
मना सर्वथा पाप बुद्धी नको रे
मना धर्मता नीती सोडू नको हो
मना अंतरी सार विचार राहो ।।४।।
चार ते दहा श्लोकांमध्ये श्री समर्थांनी अध्यात्म अनुकूल जीवन कसे असावे याविषयी मनाला उपदेश केला आहे.
हे मना दुष्टवासना ठेवू नकोस वासना म्हणजे तीव्र इच्छा. ही संस्कारातून निर्माण होते. माणसाच्या मनावर जन्मोजन्मीचे प्रबळ संस्कार असतात. त्यांचा नायनाट करण्यासाठी वर्षानुवर्ष साधना करावी लागते.सामान्य माणसाला साधनेपेक्षा या संस्कारातून येणाऱ्या वासना अधिक महत्त्वाच्या वाटतात. त्यांच्या पूर्तीसाठी तो सतत कर्म करतो आणि कर्मफळा संबंधित अपेक्षा निर्माण करतो. त्या पूर्ण झाल्या की आपल्याला सुख होतं आणि अपुऱ्या राहिल्या तर दुःख होते.या प्रबळ वासना पुऱ्या करण्यासाठी तो नीतीच्या सर्व पायऱ्या ओलांडतो त्यातूनच गुन्हेगारी,अत्याचार, हिंसाचार, खून,दरोडे इत्यादी दुष्ट वासना निर्माण होतात व जीवनाचा पूर्ण नाश होतो. व्यवहाराचा भर आचरणाच्या बाह्य अंगावर असतो तर अध्यात्माचा भर अंतरंगावर असतो.लोकांनी चांगले म्हणावे म्हणून नीती धर्माने वागणारा माणूस खरा सज्जन नव्हे.नीती धर्माने वागणे भगवंताला आवडते म्हणून सदाचरणाने वागणारा माणूस श्री समर्थांना हवा आहे. दुष्ट वासना आणि पाप बुद्धी या दोन मध्ये जगातील साऱ्या अनीतीचे व अ धर्माचे मूळ सापडते.मनातून त्यांची हकालपट्टी झाल्याशिवाय भगवंताचे दर्शन होत नाही भक्तीच्या अभ्यासामध्ये नीतीचे आचरण प्राणापलीकडे सांभाळावे लागते . समर्थ मनाला नीती सोडू नको असा उपदेश करीत आहेत.
सारं विचार म्हणजे विचारांचे मूळ किंवा महत्त्वाचा विचार.हा मूळ विचार एकच असू शकतो, तो म्हणजे मानवी जीवनाचे साफल्य ज्यात आहे अशी ईश्वर भक्ती.तेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून माणसाने आपले जीवन घालवावे.यासाठीच समर्थ या श्लोकात सांगतात हे मना तुझ्या ठिकाणी दुसऱ्याला त्रास देण्याची दुष्ट वासना व आपला फायदा करून घेण्याची पापबुद्धी यांना थारा देऊ नकोस.धर्म कर्तव्य व नीती यांचं पालन कर. धर्मता म्हणजे धर्मा चरणाची आवड.इथे धर्म म्हणजे आपलं इतरांच्या बाबतीतील कर्तव्य असा अर्थ आहे. उदाहरणार्थ पितृधर्म मातृधर्म,पुत्र धर्म,पतीधर्म,पत्नी धर्म,शिष्य धर्म, मानवधर्म असे अनेक प्रकारचे धर्म येतात. ईश्वर भक्तीचा मूळ विचार तुझ्या अंतरात सदैव असू दे.
!! जय जय रघुवीर समर्थ !!
=========================================================================
मना पाप संकल्प सोडून द्यावा!!
मना सत्य संकल्प जीवी धरावा!!
मना कल्पना ते नको विषयांची!!
विकारे घडे हो जनी सर्व ची ची ।।५।।
मन हे विचारांचे उगमस्थान असल्यामुळे मनात बरे -वाईट, बरोबर -चूक असे सर्व प्रकारचे विचार येणारच. भविष्यकाळातील वस्तुस्थिती कशी असेल याची माहिती नसल्यामुळे ती कशी असेल किंवा कशी असावी तसेच एखादी वस्तू किंवा माणूस आपल्या दृष्टी आड असल्यास तो आता कसा असेल यासंबंधी माणसाच्या मनाने केलेला विचार म्हणजे कल्पना. हा विचार योग्य असल्यास त्याला सम्यक कल्पना किंवा संकल्प असे म्हणतात. आणि हा विचार अनिश्चित व अयोग्य असल्यास त्याला विकल्प असे म्हणतात.
मागच्या श्लोकात समर्थांनी पाप बुद्धी नको असं सांगितले.पाप म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याला त्रास देणे अशी प्रवृत्ती नको पण प्रत्यक्षात असे विचार मनात आले तर... तेव्हा असा पाप संकल्प मनात आलाच तर त्याप्रमाणे काही कृती न करता तो तसाच सोडून द्यावा व त्याच्या ऐवजी सत्य संकल्प करावा सत्य म्हणजे सदैव असणार व आपलं स्वरूप कधीही न बदलणार तत्व. व्यवहारात सत्य म्हणजे खरं.खरे पणाने वागल्यास आपला फायदाच होतो भक्तिमार्गात सत्य म्हणजे ईश्वर.म्हणून सत्य संकल्प करून ईश्वर प्राप्ती करून घ्यावी व पाप संकल्प सोडून द्यावा.
विषय म्हणजे देहाच्या माध्यमाने वस्तू पासून सुख मिळवण्याची वासना किंवा इच्छा विषयाचे सुख. आपल्याला सततच कायम सुख मिळत राहील याची शाश्वती नाही म्हणून त्याची आसक्ती किंवा अपेक्षा ठेवू नये. वासना ही मानसिक शक्ती आहे तिला जिकडे वळवावे तिकडे ती वळते. ती दृश्याकडे धावली व वस्तूला चिकटली तर क्षणभर सुख देते पण मोठी अशांती निर्माण करते. विकार म्हणजे मनाचे रूपांतर, मनाचा क्षोभ व अशांती अपेक्षांचा अंत दुःख निर्मितीतच होतो. वस्तूंवर केंद्रित झालेली वासना माणसाला विवेक भ्रष्ट करते. भल्या बुऱ्या कोणत्याही मार्गाने इच्छा पूर्ण करण्यासाठी माणूस प्रयत्न करतो . क्रोध लोभ मोह,मद मत्सर इत्यादी विकारांची निर्मिती होते अशा विकारांचा उगम मनात ठाण मांडून बसतो अविवेकी माणूस वासनापूर्तीसाठी विकार वश होऊन करू नये ते करतो त्यामुळे समाजात त्याची किंमत राहत नाही.फजिती होते. जगात छी थू होते.
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
=====================================================================
Comments
Post a Comment